Thursday, 15 October 2026

अवघा रंग एक झाला | तो श्रीरंग रंगी रंगला ।। Surendra Naik

सुरवात कशी करावी माहिती नाही, पण हा बाबांच्या हस्तलिखित शेवटच्या पानाचा शोध आहे असेही म्हणता येईल.

बाबा स्वतः गात असत. गाणे त्यांच्यासाठी केवळ ऐकण्याची गोष्ट नव्हती. शास्त्रीय संगीताची त्यांना जाण होती, त्याची आवड होती; पण त्याच वेळी एखादे आवडते हिंदी गाणे लागले की त्याचा आनंद घेण्यातहि त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. ते बॉलीवूड आणि सिनेमा फॅन होते असं म्हणायला काहीच हरकत नाही , त्यांना जाणणाऱ्या सगळ्यांना ते चांगलेच माहिती आहे. त्यांच्या रसिकतेला फारसे कुंपण नव्हते. पंडित जसराज, पंडित राशीद खान साहेब, पंडित भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर असोत किंवा जगजीत आणि चित्रा सिंग, गुलाम अली साहेब, तालत मेहमूद, मराठी, हिंदी गझल, चित्रपटगीत काहीही का असेना — गाणे चांगले असेल तर ते त्यांचे.
त्यांच्या ऑफिसमधले मित्र त्यांना देवानंद म्हणायचे, तेव्हा मला हे सगळं हास्यास्पद वाटायचं. पण नंतर जाणवल त्यात बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू दिसतो—जिवंतपणा, देखणेपणा, गाणे, विनोद आणि जगण्याकडे पाहण्याची एक प्रसन्न नजर. माझी मामे बहीण निवेदिता मात्र त्यांना "संत मामा" म्हणायची.

मला नेहमी वाटायच — एकाच माणसाला "देवानंद" आणि "संत मामा" ही दोन अगदी वेगळी बिरुदे मिळणे, ही बाबांची विरोधाभासी ओळख असावी.पण ते मित्र होते - सगळ्यांचे. आणि एक गोष्ट मी त्यांच्या बाबतीत अगदी ठामपणे सांगू शकते. बाबांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची अजिबात सवय नव्हती. कुणाच्या घरात काय चालले आहे, कोणाचे कोणाशी काय भांडण आहे, कोण काय म्हणाले—या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना रस नसे. मैत्री करायची, मनापासून करायची, माणसाला आपले मानायचे; पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याची दारं उघडून आत डोकावयाचे नाही. मात्र त्यांचा राग, चिडचिड वा काही बोलायची त्यांची हक्काची जागा फक्त एकच होती, ती म्हणजे "अगं" ,त्यांची बायको , माझी आई विभा. तिच्याव्यतिरिक्त ते इतर कोणासमोर हे सगळं व्यक्तच करत नव्हते. आणि तेवढच तिच्यावर त्यांचं प्रेम होत. काय घालावं, छान राहावं , जे हवय ते घ्यावं, तिने मन मारू नये. असो, सांगायचं एकच, ते माणसांमध्ये होते; पण माणसांच्या आयुष्यात घुसत नव्हते. कदाचित म्हणूनच त्यांचे मित्र त्यांच्यावर इतक प्रेमहि करत असावेत. त्यांचे लहान पणी पासून ऑफिस पर्यंत सगळे मित्र त्यांना खूप जवळचे होते. म्हणून गट्टू काका गेले त्याचे त्यांना आम्ही सांगितलेही नाही कधी. आणि त्यांनी हे मानले हि कि ते मुलीकडे कॅनडा ला गेलेत आणि timezone मुळे फोन वर पण बोलू शकणार नाहीत.
आज मागे वळून पाहताना, मला पुन्हा पुन्हा गहिवरून येत, साहजिक आहे. माझा बाबा होता तो. त्यांना मी त्यांच्या नावानेही बोलावण्याची त्यांनी मला मुभा दिली होती. कारण माझाही मित्रच होता तो, पण बापाची सीमा आणि हद्दी त्यांनी नकळत स्पष्ट केल्या होत्याच. मागच्या काही वर्षांत आणि त्या शेवटच्या काही महिन्यांत बाबा पुन्हा एकदा एका वेगळ्याच सहवासात रमले होते , तो म्हणजे पुस्तकांचा.

बाबांना पुस्तकांची आवड होती, असे म्हणणे पुरेसे नाही. ती त्यांना होतीच, गॉड्स पार्टीकल पासून ऍटोमिक हॅबिट पर्यंत आणि पु लं पासून बिग बँग पर्यंत त्यांच्याशी मी चर्चा केलीये. पण या काही मागच्या महिन्यांत त्यांची पुस्तकांची लत अतिशय वाढली होती, कारण त्यांचा मोबाईल बॅन झाला होता. तेव्हा एखाद्या पुस्तकाची समीक्षा वाचली, कोणीतरी उल्लेख केला, कुठेतरी त्याचे नाव दिसले की ते पुस्तक त्यांना हवेच असायचे. आणि मग ते पुस्तक मिळवण्याची जबाबदारी माझी.
पंढरगे विठ्ठले हे पुस्तक याचेच उदाहरण. वर्तमानपत्रात त्या पुस्तकाची समीक्षा आली. बाबांनी ती वाचली. पुस्तक हवेच हे नक्की झाले. “मिळेल का?” हा प्रश्न नव्हता च मुळी.
“पुस्तक पाहिजे.” आता ते कुठे मिळते, कोणाकडे आहे, ऑर्डर कसे करायचे—हे माझे काम. मी शोधले. मागवले. पुस्तक आले. त्यांच्या हातात दिले.
आज त्या छोट्याशा प्रसंगाची आठवण झाली की मला वाटते—बाबा ना पुस्तकांपेक्षा काय नवीन माहिती मिळवता येईल वा कोणत्या प्रश्नांच उत्तर कुठे शोधावं असं वाटत असावं.
गेल्या काही दिवसांत त्यांचे वाचन विशेषतः देव, संत, अध्यात्म आणि जीवनाच्या अर्थाभोवती फिरत होते. ब्रह्मांडनायक, लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य आणि अशी कितीतरी पुस्तके. काही एकदा वाचून संपली नाहीत. पुन्हा वाचली. पुन्हा उघडली.चक्क पारायणं केली, एखादी ओळ पुन्हा पाहिली, लिहून ठेवली, बुकमार्क केली.

एकीकडे शास्त्रीय संगीताचा रसिक, दुसरीकडे हिंदी सिनेमाच्या गाण्यांचा चाहता. स्वतः गाणारा, नाईकांचा बंडू, मित्रांचा देवानंद, निवेदितेचा संत मामा. आणि या वेळी गीता, संत, विठ्ठल आणि अध्यात्म वाचत बसलेला माझा बाबा. मला वाटते, माणूस यापेक्षा जास्त बहुरंगी असूच शकत नाही. आणि मग तो गेल्यावर त्याच्या डायऱ्या चाळताना (अर्थातच गाण्याच्या आणि काही नोट्स) मला एक पान सापडले. त्यांचे शेवटचे लिखाण. ज्यावर त्याने लिहिले होते — अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥ आणि मी बराच वेळ त्या पानाकडे पाहत राहिले. त्यांनी संत सोयराबाईंचा अभंग लिहून ठेवला होता. अभंगाचा अर्थ मला माहीत होता; पण त्या क्षणी अर्थापेक्षा मला दिसत होता तो माझा बाबा.
हि काही नवीन गोष्ट नक्कीच नाही. माणूस या जगातून निघून गेल्यावर आपली ओढ सहजच त्याच्या मागे राहिलेल्या वस्तूंकडे असते. मग ती व्यक्ती काय विचार करत असेल तेव्हा, काय होत त्यांच्या मनात, काही सांगायचं असेल का त्यांना वगैरे वगैरे , पण असं काही नसत , तो आपला भाव असतो आणि तो असण्यात काहीही वावगं नाही. कारण व्यक्ती गेल्यावर त्याचं मन समजून घेणं हे त्याच्यासाठी नसून आपला आपल्या स्वतःसाठी केलेला प्रयत्न असतो स्वतः च मन शांत करण्याचा. आणि कदाचित तसच काहीस माझं झाल असावं.

कदाचित म्हणूनच या अभंगाकडे पाहताना मला वाटते— “अवघा रंग एक झाला” हे लिहिताना किंवा ऐकताना, बाबा कदाचित आयुष्याच्या सगळ्या रंगांकडे एकत्र पाहत असावेत. गाणे, पुस्तकं, माणसं, अनुभव, आनंद, दुःख—सगळे वेगळे असूनही एका मोठ्या चित्राचा भाग आहेत, अशी एखादी शांत जाणीव त्यांच्या मनात आली असावी का तेव्हा.? “मी-तूपण गेले वाया” या ओळीतून कदाचित आपले ‘मी’, आपले राग, आग्रह आणि अपेक्षा यांच्यापलीकडे काहीतरी मोठे आहे, असे त्यांना जाणवले असेल का? “नाही भेदाचे ते काम” ही ओळ त्यांच्या स्वभावाशी मला जोडलेली वाटते. माणूस त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता; भेद नव्हते. ते सगळ्यांचे मित्र होते, पण कोणाच्याही आयुष्यात डोकावत नसत. कदाचित माणूसपण बाकी सगळ्यांपेक्षा मोठे आहे, असे त्यांना या शब्दांत जाणवले असेल. “पळोनी गेले क्रोध काम”—कदाचित मनातले राग, आग्रह आणि अपेक्षा थोडे बाजूला ठेवण्याची जाणीव. “देही असोनी विदेही” ही ओळ मात्र त्यांच्या त्या दिवसांच्या वाचनाशी मला विशेष जोडलेली वाटते. बाहेरून ते तेच बाबा होते—गप्पा करणारे, गाणे ऐकणारे, स्वतः गाणारे, एखाद्या पुस्तकासाठी मुलासारखा हट्ट करणारे; पण आतून कदाचित स्वतःशी, देवाशी किंवा जीवनाशी एखादा वेगळाच संवाद सुरू झाला होता. आणि “पाहते पाहणे गेले दूरी”—कदाचित खूप शोधल्यानंतर एक क्षण असा येतो, जेव्हा शोधणारा माणूसच शांत होतो. बाबा त्या क्षणी काय अनुभवत होते, हे मला माहीत नाही. हे फक्त माझे आकलन आहे. त्यांच्या मनात नेमके काय होते, हे आता त्यांच्या सोबत गेले. आणि मला तसे म्हणण्याचा अधिकारही नाही की हा त्यांचा निरोप होता. कदाचित त्यांना त्यांच्या जाण्याची कोणतीही चाहूल नव्हती. कदाचित हा अभंग त्यांना आवडला म्हणून त्यांनी लिहून ठेवला. कदाचित किशोरीताईंच्या आवाजात तो ऐकला आणि एखादी ओळ मनात राहिली. कदाचित त्यांच्या त्या दिवसांच्या वाचनातून तो सहज त्यांच्या डायरीत आला.
कदाचित माझ्या समजण्यापेक्षा त्यामागे काहीतरी खूप खोल होत किंवा कदाचित काहीच नाही. पण त्या पानामुळे मला बाबांचा एक वेगळा चेहरा पुन्हा दिसला.

तो चेहरा जो गाण्यात रमायचा. जो कधी देवानंद व्हायचा तर कधी संत मामा. जो आपल्या भावांसोबत आणि मित्रांमध्ये मनापासून हसायचा. जो दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत नसे. जो एखाद्या पुस्तकासाठी लहान मुलासारखा हट्ट करायचा. आणि जो शेवटपर्यंत काहीतरी वाचत, काहीतरी शोधत राहिला.
कदाचित बाबांचे आयुष्यच या अभंगासारखे होते—अनेक रंगांचे. शास्त्रीय संगीताचा रंग. हिंदी गाण्यांचा रंग. मैत्रीचा रंग. कुटुंबाचा रंग. पुस्तकांचा रंग. हट्टाचा रंग. हसण्याचा रंग. आणि शेवटच्या दिवसांत अध्यात्माचा एक शांत रंग. म्हणून त्यांच्या शेवटच्या पानावर लिहिलेले - मला आता वेगळेच वाटते. कदाचित हा निरोप नव्हता. कदाचित हा निष्कर्ष नव्हता. कदाचित तो फक्त त्या दिवसाचा एक विचार होता. पण माझ्यासाठी तो बाबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला जोडणारा एक धागा झाला आहे. कारण माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी एका रंगाच्या नसतात. त्या अनेक रंगांच्या असतात. काही आठवणींवर आपण हसतो. काहींवर डोळे पाणावतात. काही आठवणींवर आपल्याला अभिमान वाटतो. काही आठवणी आपल्याला प्रश्न विचारतात. बाबांच्या आठवणी तशाच आहेत. काही माणसे आपल्याला उत्तर देऊन जात नाहीत. ते आपल्याला शोध देऊन जातात. आणि बाबा कदाचित माझ्यासाठी असाच एक शोध ठेवून गेले आहेत.
माझा तो बाबा आता नाही , तो गेला श्रीरंग रंगी रंगला आणि त्याच्यासाठी तेव्हा तो अवघा रंग एक झाला ।