Friday, 12 June 2026

एक होता पु. ल.

प्रत्येकाला लहान पणापासून काहीतरी वेगळं करण्याची सवय असते, किंवा ओढ म्हणता येईल, मला विनाकारण पुस्तकं बघण्याची असावी. वाचण्याकडे कधी तेव्हा कल गेला नव्हता. पण मजा यायची पुस्तकं बघायला. बाबांची गाण्याची, काही इंग्रजी नॉव्हेल्स , तर पोथ्या , ग्रंथ आणि मराठी  पुस्तकं ... असा सगळं तो पसारा असायचा. आलमारीचा एक खाणा कॅस्सेट्स चा होता तर दुसरा पुस्तकांचा.  

असो, पण आमच्या घरात दोन गोष्टींना कधी कुलूप लागलं नाही — एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरं म्हणजे पुस्तकांचं कपाट. त्या कपाटात पुस्तकांपेक्षा आठवणी जास्त होत्या. एखाद्या पुस्तकात जुनं वीजबिल, एखाद्यात आजोबांच्या चष्म्याचा नंबर, तर एखाद्यात कुणाचंतरी लग्नाचं निमंत्रण सापडायचं. पण त्या सगळ्या पसाऱ्यात एक नाव मात्र कायम दिसायचं — पु. ल. देशपांडे.

बाबा पुस्तक काढायचे तेव्हा त्यांचा चेहरा असा उजळायचा, जसा एखादा माणूस जुन्या मित्राला भेटल्यावर उजळतो (आता माझंही तसंच होत म्हणा...). आजोबांनाही काही नेमक्या लेखकांच्या पुस्तकांची आवड होती तेव्हा मला प्रश्न पडायचा — “हे पु. ल. नक्की आहेत तरी कोण?” कारण घरात त्यांच्याबद्दल बोलताना “लेखक” हा शब्द फारसा वापरला जात नसे. कोणी म्हणायचं, “अगं, तो बटाट्याच्या चाळवाला!” तर कोणी “व्यक्ती आणि वल्ली”मधलं एखादं पात्र आठवून घरातल्याच कुणाशी त्याची तुलना करायचं. पुढे हीच प्रथा आमच्यापर्यंत आलीच. 

मराठी घरं म्हणजे , साधी राहणी आणि साधेच विचार. अवडंबर तरी करण्याची काही गरज नाहीच टाईप. असो, तुमचं आमचं , कमी जास्त पण जवळपास सारखच आणि तसं पहिल तर मराठी घरांमध्ये एक गोष्ट कायम दिसते — मुलांना खेळवण्यासाठी, शांत करण्यासाठी किंवा फक्त हसवण्यासाठी काही ठरलेल्या गोष्टी, किंवा ठरलेली गाणी हमखास लावली वा गायली जातात. प्रत्येक घराचं playlist वेगळं असलं तरी त्यात एक गाणं मात्र जवळजवळ कायम असतंच — “नाच रे मोरा…” गीत ग. दि. माडगूळकरांचं… आणि संगीत पु. ल. देशपांडेंचं. 

माझ्या बाबतीतही तेच झाल, कदाचित पु. ल. देशपांडे हे नाव समजण्याच्या आधीच त्यांचं संगीत कानावर पडलं होतं. अर्थ समजण्याचं वय नव्हतं, पण त्या गाण्यातली निरागसता, त्यातलं बालपण आणि सहज आनंद देणारी लय नकळत मनात घर करून गेली होती, आताही लक्षात आहे ती. कदाचित प्रत्येकासोबतच असं काहीतरी झाला असावं . तर असं म्हणायला हरकत नाही कि खरी गंमत म्हणजे पु. ल. मला आधी ऐकू आले… आणि मग वाचायला मिळाले , नंतर सतत भेटत गेले.

त्यांना वाचताना कधीच “हे साहित्य आहे” असं वाटलं नाही. उलट असं वाटायचं, की आपल्या घरातला कुणीतरी मोठा व्यक्ती समोर बसून गोष्टी सांगतोय. त्यांच्या गोष्टीतला “हीरो” कधीच परिपूर्ण आणि परफेक्ट नव्हता. तो विसरभोळा होता, थोडा बावळट होता, कधी अती शहाणा होता — पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माणूस, एक व्यक्ती होता आणि त्याची आपली वल्ली होती. तो तुमच्या माझ्यातला होता. आजच्या काळात लोक character sketch लिहितात; पु. ल. मात्र माणूस लिहायचे.

चितळे मास्तर, सखाराम गटणे, नारायण, रावसाहेब… ही माणसं आजही कुठेतरी आपल्या आसपास फिरताना दिसतात. “असा मी असामी” वाचताना अनेकदा स्वतःचंच आयुष्य हलक्याफुलक्या आरशात दिसायला लागतं. त्यांच्या परदेश प्रवासाच्या वर्णनांमध्येही केवळ प्रवास नव्हता; तिथेसुद्धा माणसं होती, निरीक्षण होतं आणि स्वतःवर हसण्याची ताकद होती.

म्हणूनच त्यांच्या व्यक्तिरेखा पुस्तकांत अडकून राहिल्या नाहीत; त्या आपल्या बोलण्यात आल्या, आपल्या निरीक्षणात आल्या, आपल्या घरातल्या उदाहरणांत आल्या. एखाद्या कुत्र्याचं नाव ठेवायचं म्हटलं, की लगेच “रावसाहेबांचा जिमी” आठवायचा. त्याच्या पुढचा शब्द पुलं च्याच आवाजात आणि स्टईलमध्ये मस्त वाटतो.... असो,  घरात एखादा फार अभ्यासू मुलगा दिसला, की “हा तर सखाराम गटणेच!” तेव्हा सरस्वती तोंडात छापखाना कशी उघडते ते कळलं. सांगायचं असं कि पु. ल. हे आमच्या घरात कधी “ओळख करून द्यायची” व्यक्ती नव्हतेच; ते आधीपासूनच घरात होते.

गंमत म्हणजे एकाच व्यक्तीत इतकं सगळं कसं असू शकतं — लेखक, संगीतकार, विनोदी लेखक, अभिनेते, वक्ते, कथाकथनकार… पण तरीही या सगळ्यांच्या पलीकडे ते होते.

त्यांच्या लिखाणातला विनोद हा कोणाची टिंगल करणारा नव्हता, तर माणसाच्या स्वभावावर प्रेम करणारा होता. आज कॉन्टेन्ट खूप आहे, पण माणसं समजून घेणारं लिखाण / writing  कमी होत चाललं आहे. पु. ल. माणसं समजून घ्यायचे. म्हणूनच त्यांना वाचताना आपण साहित्य वाचत नाही, तर कोणत्यातरी एका व्यक्तीच्या वल्लीशी नक्कीच भेटत असतो. आणि नकळत ती व्यक्ती , ते लिखाण खूप काही शिकवून जातं. 

आजही जेव्हा आयुष्य खूप गोंधळल्या सारखं  वाटतं, किंवा फक्त स्वतःसाठी एखादा शांत कोपरा हवा हवासा होतो, तेव्हा नकळत हात पु. ल. यांच्या पुस्तकांकडे जातो. त्यांच्या पुस्तकांत एक वेगळीच शांतता आहे. मग ते कथानक असो वा नाटक , पण जगण्याकडे थोडं थांबून बघायला शिकवणारी एक सुंदर सोबत आहे.

पु. ल. वाचताना अनेकदा असं वाटतं, की आपणही त्या “बटाट्याच्या चाळ”मधल्या एखाद्या खोलीत राहतोय, “असा मी असामी” म्हणत स्वतःवरच हसतोय, आणि आजूबाजूला फिरणाऱ्या “व्यक्ती आणि वल्ली” ओळखतोय. कधी “गणगोत”मधली माणसं आपल्या घरातलीच वाटतात, तर “हसवणूक” आणि “खोगीरभरती” वाचताना समाजाकडे बघण्याची नजरच बदलते. त्यांच्या “अपूर्वाई”, “पूर्वरंग” किंवा “जावे त्यांच्या देशा”मधून जग फिरताना कळतं, की प्रवास हा फक्त ठिकाणांचा नसतो; तो माणसांचा आणि संस्कृतीचाही असतो. “ती फुलराणी”, “तुझे आहे तुजपाशी”सारख्या नाटकांतून त्यांचं रंगभूमीवरचं सामर्थ्य दिसतं, तर “भावगंध”, “आपुलकी”, “मित्रहो!”मधून त्यांच्या लेखणीची संवेदनशील बाजू भेटते. एकीकडे संगीत दिग्दर्शक म्हणून “नाच रे मोरा”, "कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई ", "शब्दावाचुन कळलेसारे शब्दांच्या पलिकडले", "इंद्रायणी काठी, देवा दे ची आळंदी", आणि कितीतरी अशी अजरामर गाणी देणारा कलाकार, तर दुसरीकडे कथाकथनातून हजारो लोकांना हसवणारा आणि विचार करायला लावणारा वक्ता — पु. ल. म्हणजे खरंतर एक संपूर्ण सांस्कृतिक विश्व होतं. त्यांची पुस्तकं म्हणजे फक्त साहित्य नाही; ती आयुष्याला जरा... हलक्यानं घेण्याची, माणसांवर प्रेम करण्याची आणि स्वतःकडे मिश्किलीने  बघण्याची एक सुंदर पद्धत आहे.

मला अनेकदा असं वाटतं, की त्यांच्या काळात “mental health expert” / मानसिक रोग तज्ज्ञ हा शब्द कदाचित नसावा ; कारण  माणसांच्या मनाचा इतका खोल अभ्यास करणारा पु ल नावाचा एक अवलिया तेव्हा तिथे होता. त्यांनी लोकांना उपदेश दिले नाहीत; त्यांनी लोकांना स्वतःवर हसायला शिकवलं. आणि कधी कधी स्वतःवर हसू येणं, हेच मन हलकं करण्याचं आणि आयुष्याकडे जरा सकारात्मक पद्धतीने बघण्याचं पहिलं पाऊल, असे म्हणता येईल.

एखाद्याला मराठी पुस्तक वाचायला सांगायचं असेल ना , तर त्याने आधी पु. ल. वाचावं असं मला नेहमी वाटतं. कारण ते फक्त भाषा शिकवत नाहीत; ते आपल्या व्यतिरिक्त इतरांकडे , समाजाकडे आणि परिस्थिती कडे बघण्याची नजर देतात आणि मराठी कशी सोपी असूनही संप्पन्न आहे त्याची सहज जाणीव करून देतात.

असो, एक खंत मात्र कायम मनात नेहमी राहिली — मला पु. ल. ना प्रत्यक्ष भेटता आले नाहीत. त्यांच्या समोर बसून त्यांचं बोलणं ऐकायला आवडलं असतं. ते माणसांचं निरीक्षण कसं करत असतील, हे पाहायला आवडलं असतं. कारण मला खात्री आहे — त्यांना जर भेटता आल असत, तर त्यांनी आपल्यातसुद्धा एखादी “वल्ली” शोधलीच असती. पण मग वाटतं, कदाचित काही माणसं प्रत्यक्ष भेटली नाहीत तरी चालतं. कारण ती भेटत राहतात — जुन्या पुस्तकाच्या अरोमातून भावगंधा सारखी, रेडिओवर (आता सोसिअल मीडिया वा कुठेतरी ) अचानक लागलेल्या गाण्यातून, YouTube वरच्या एखाद्या जुन्या कथाकथनातून किंवा आयुष्य फार कोरडं वाटायला लागलं, की अचानक आलेल्या सरींनी ओलावा यावा तसा आठवलेल्या एखाद्या ओळीतून. 

आणि म्हणूनच आजही “एक होता पु. ल.” हे वाक्य लिहिताना  मनाच्या खोलीतून एक आवाज आल्याशिवाय राहत नाही आणि एकच दुरुस्ती करावीशी वाटते , ती म्हणजे  —

“पु. ल. होता नाही… आहे.”




* मृणाल नाईक